पोलीस उप महानिरीक्षक यांच्या लेखणीतून
महाराष्ट्र हे देशातील एक अग्रेसर, प्रगतशील व सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. येथील समाज घटकांवर संत महात्म्यांचा मोठा प्रभाव आहे.
माणूस हा शिस्तप्रिय प्राणी आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या परीने स्वयंशिस्तीने राहण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर, प्रत्येकावर असणारे संस्कार व सामाजिक बंध त्यास चौकटीबाहेर ढळू देत नाहीत.
समाजात जे जे अनिष्ट घडते, त्याची दुरुस्ती अर्थातच पोलिसांनी करावी अशी नागरिकांची अपेक्षा असते. पोलिसांना मात्र, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करताना, कायदेशीर बंधने देखील विचारात घ्यावी लागतात.
पोलीस ही एक समाजास 'सेवा देणारी यंत्रणा' आहे. त्यामुळे, नागरिकांना पोलिसांकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांमध्ये सकारात्मक व गतिमान कार्यपद्धती अंमलात आणणे महत्त्वाचे आहे. संगणकाच्या युगात, दर दिवशी नागरिकांच्या अपेक्षा या देखील गतिमान होत आहेत. त्यामुळे, नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी पोलीस देखील अहोरात्र झटत आहेत.
नांदेड परिक्षेत्रातील नागरिकांसाठी या कार्यालयाची वेबसाईट नव्याने तयार करण्यात आली आहे. नागरिकांना, सदर वेबसाईट वापरणे सुकर व्हावे या दृष्टिकोनातून, त्यात विषयांची सुलभपणे मांडणी करण्यात आली असून, कार्यालयाची रचना, पोलिसांचे विविध उपक्रम, कायदे इत्यादी बाबत व माहिती अधिकार कायद्यास अपेक्षित असलेली सर्व आवश्यक माहिती या वेबसाईट मधून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर वेबसाईट वापरताना नागरिकांना, काही अडचणी आल्यास, अथवा त्यांना पोलीस कामकाजाशी निगडित काही तक्रारी करावयाच्या असल्यास, त्याबाबतची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
महिला व समाजातील उपेक्षित घटकांप्रती परिक्षेत्रातील पोलीस, अधिक सहृदयतेने वागतील. नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार नेहमीच अधिक सकारात्मकतेने व सेवाभावाने आपले कर्तव्य बजावतील, अशी ग्वाही देतो.
शहाजी उमाप
पोलीस उप महानिरीक्षक,
नांदेड परिक्षेत्र, नांदेड